लाभार्थी
राज्यातील ४ आकांक्षित जिल्हयातील (गडचिरोली, नंदुरबार, धाराशिव ,वाशिम) वय वर्ष १४ ते १८ या वयोगटातील शाळाबाहय असलेल्या मुलीं.
वर्णन
सदर योजना ही किशोरवयीन मुलींकरिता योजना SAG (Scheme for Adolescent Girls) या नावाने राज्यातील ४ आकांक्षित जिल्हयातील (गडचिरोली, नंदुरबार, धाराशिव ,वाशिम) या जिल्ह्यांत सुरु करण्यात आलेली आहे. यापूर्वी सदरयोजनेचे नांव राजीव गांधी किशोरवयीन मुलींचे सक्षमीकरण "सबला योजना असे होते. केंद्र शासनाने सुचविलेल्या बदलानुसार यापुढे किशोरवयीन मुलींकरिता योजना SAG (Scheme for Adolescent Girls) या नावाने शासननिर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत अंगणवाडी क्षेत्रातील आकांक्षित जिल्ह्यामधील १४ ते १८ या वयोगातील शाळेत किशोरवयीन मुलींसाठी लागू असून त्यांना पोषण आहारांतर्गत घरपोच आहार म्हणून कच्चे अन्नधान्य उपलब्ध करुन दिले जाते. तसेच जीवन कौशल्य, आहार व आरोग्य विषयक माहिती तसेच व्यवसाय प्रशिक्षण याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येते.
योजनेची उद्दीष्टे
१) किशोरवयीन मुलींचे स्व-विकास आणि सक्षमीकरण करणे.
२) किशोरवयीन मुलीमंधील पोषण आणि आरोग्य स्थिती सुधारणे.
३) आरोग्य, पोषण आणि स्वच्छतेबद्दल जागरूकता वाढविणे.
४) शालाबाह्य किशोरवयीन मुलींना औपचारिक शालेय शिक्षण किंवा ब्रिज लर्निंग/कौशल्य प्रशिक्षण देउन त्यांचे जीवन कौशल्ये विकसित करणे
योजनेचे स्वरुप
किशोरवयीन मुलींकरिता योजना SAG (Scheme for Adolescent Girls) या योजनेंतर्गत १४ ते १८ या वयोगटातील मुलींचा विकास व सक्षमीकरण करुन त्यांना पोषण आहाराचा लाभ देणे, त्यांना पोषण व आरोग्य विषयक दर्जा सुधारणे, लाभार्थी मुलींना आरोग्य, स्वच्छता, पोषण, प्रजनन व लैंगिक आरोग्य, कुटुंब आणि बालकांची काळजी या विषयी जाणीव जागृती निर्माण करणे, तसेच लाभार्थी मुलींना गृह कौशल्ये, जीवन कौशल्ये आणि व्यवसाय कौशल्ये उंचावण्याकरीता मदत करणे, १४ ते १८ या वयोगटातील शाळागळती झालेल्या मुलींना औपचारिक/अनौपचारिक शिक्षण देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणणे, प्रचलित सार्वजनिक सेवा उदा. प्राथमिक आरोग्य केंद्र, पोष्ट, बँक, पोलीस स्टेशन इत्यादिबाबत माहिती पुरविणे व मार्गदर्शन करणे.
निकष / कार्यप्रणाली
किशोरवयीन मुलींकरिता योजना SAG (Scheme for Adolescent Girls) ही योजना राज्यात सुधारित स्वरुपात राबविताना सध्याच्या अंगणवाडी सेविंकांच्या मार्फत राबविण्यात येत आहे. अंगणवाडी सेविका गावात घरोघरी सर्वेक्षण करून या योजनेचा लाभ घेण्यासाठी किशोरवयीन मुलींची निवड करतात. निवडलेल्या किशोरवयीन मुलींना जवळच्या अंगणवाडीत प्रशिक्षण दिले जाते. तसेच, त्यांची वेळोवेळी तपासणी करून नोंद केली जाते.