एकात्मिक बाल विकास सेवा योजना
केंद्र पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यक्रम दिनांक २ ऑक्टोबर १९७५ रोजी धारणी (अमरावती) व धारावी (मुंबई) या दोन प्रकल्पात बालकांच्या पोषण व आहार विषयक दर्जात सुधारणा करण्यासाठी तसेच बाल मृत्यूचे व कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टिने सुरु करण्यात आला. त्यानंतर टप्प्या टप्प्याने एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पात वाढ होऊन महाराष्ट्र राज्यामध्ये ५५३ बाल विकास प्रकल्प कार्यरत असून त्यामध्ये ग्रामीण व आदिवासी क्षेत्रात ४४९ प्रकल्प आणि नागरी क्षेत्रात १०४ प्रकल्प कार्यरत आहेत. केंद्र शासनामार्फत महाराष्ट्र राज्यासाठी १,१०,५५६ मंजुर अंगणवाडी केंद्र असून त्यापैकी ग्रामीण क्षेत्रात ७३,११६ अंगणवाडी केंद्र व आणि आदिवासी क्षेत्रात १७,५७१ अंगणवाडी केंद्र तसेच नागरी क्षेत्रात १९,७९९ अंगणवाडी केंद्र व प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान अंतर्गत ७० अंगणवाडी केंद्र आदिवासी भागात मंजूर झाले आहेत.
एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत अंगणवाडीतील लाभार्थ्यांना खालील ६ सेवा पुरविण्यात येत आहेत.
- पूरक पोषण आहार
- लसीकरण
- आरोग्य तपासणी
- संदर्भ सेवा
- अनौपचारिक पूर्व शालेय शिक्षण
- आरोग्य व आहार शिक्षण
योजनची उद्दिष्टे
- ० ते ६ वर्ष वयोगटातील मुलांचा पोषण व आरोग्य विषयक दर्जा सुधारणे.
- मुलांच्या योग्य मानसिक, शारीरिक, सामाजिक विकासाचा पाया घालणे.
- बालमृत्यु, बालरोग, कुपोषण आणि शाळा गळतीचे प्रमाण कमी करणे.
- बाल विकासास चालना मिळावी म्हणून विविध विभागांमध्ये धोरण व अंमलबजावणी याबाबत परिणामकारक समन्वय साधणे.
- योग्य पोषण व आहार विषयक शिक्षणाद्वारे बालकांचे सर्वसामान्य आरोग्य व त्यांच्या पोषण विषयी गरजांकडे लक्ष पुरविण्या विषयीची मातांची क्षमता वाढविणे.
एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत पुरविण्यात येणाऱ्या सेवांचा तपशिल खालील प्रमाणे
सेवा | लाभार्थी प्रकार | सेवा कोणामार्फत दिल्या जातात |
पूरक पोषण आहार (Supplementary Nutrition) | ६ वर्षा खालील मुले | अंगणवाडी सेविका/मदतनीस |
लसीकरण (Immunization) | ६ वर्षा खालील मुले, गर्भवती स्त्रिया व स्तनदा माता | आरोग्य विभागाच्या सहकार्याने एएनएम/एमओ |
आरोग्य तपासणी (Health Checkup) | ६ वर्षा खालील मुले, गर्भवती स्त्रिया व स्तनदा माता | आरोग्य विभाग व एबाविसेयो एएनएम/एमओ/अंगणवाडी सेविका |
संदर्भ सेवा (Referral Services) | ६ वर्षा खालील मुले, गर्भवती स्त्रिया व स्तनदा माता | आरोग्य विभाग व एबाविसेयो एएनएम/एमओ/अंगणवाडी सेविका |
अनौपचारिक पूर्व शालेय शिक्षण (Pre School Education) | ३ ते ६ वर्षे वयोगटातील बालके (मुले/मुली) | अंगणवाडी सेविका |
आरोग्य व आहार शिक्षण (Nutrition and Health Education) | १५ ते ४५ वयोगटातील महिला | आरोग्य विभाग व एबाविसेयो एएनएम/एमओ/अंगणवाडी सेविका |
वरील प्रकारे सेवा पुरविण्याकरिता तालुकास्तरावर बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका/मुख्यसेविका तसेच प्रत्येक अंगणवाडी केंद्रावर अंगणवाडी सेविका व मदतनीस व नागरी प्रकल्पा करिता प्रकल्पस्तरावर बाल विकास प्रकल्प अधिकारी, मुख्यसेविका तसेच प्रत्येक अंगणवाडी केंद्रावर अंगणवाडी सेविका व मदतनीस अशाप्रकारची यंत्रणा कार्यरत आहे.